Nigdi : एक चोरी अशीही; तो पळवतो फक्त ब्रँडेड बूट

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण परिसरात एका बूट चोराने चांगलाच हैदोस घातला आहे. मागील काही महिन्यांपासून त्याने परिसरातील शेकडो बूट चोरून नेले आहेत. या चोराचे वैशिष्ट्य म्हणजे, हा चोर केवळ ब्रँडेड बूट चोरून नेतो. एका बुटाची किंमत हजारो रुपये असल्याने निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. घरफोडी, जबरदस्तीने ऐवज हिसकावणे, शस्त्राचा धाक दाखवून चोरी केल्याचे प्रकार दररोज समोर येतात. पण, याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक चोरीचा प्रकार असू शकतो, हे यावरून समोर येत आहे.

निगडी प्राधिकरण परिसरात उच्चभ्रू लोकवस्ती आहे. साधारणपणे एका व्यक्तीकडे दोन ते तीन चपला असतातच. सकाळी व्यायामासाठी जाताना वेगळा बूट असतो. घरी वापरण्यासाठी एखादी चप्पल, ऑफिसला जाण्यासाठी एखादा बूट आणि त्याव्यतिरिक्त सण, समारंभाला वापरण्यासाठी एखाददुसरी चप्पल अथवा बूट असतो. बूट ठेवण्यासाठी प्रत्येक घरामध्ये घराच्या बाहेर चप्पल स्टॅन्ड केलेले असते. त्या स्टॅन्डकडे सहसा कुणाचेही लक्ष जात नाही. पण, याच स्टॅन्डमध्ये हजारो रुपयांचा ऐवज ठेवल्याचे हेरून बूट चोर बुटांची चोरी करीत आहे.

  • पहाटे तीनच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असतात. लोकांच्या साखरझोपेला सुरुवात होत असतानाच बूटचोर घराची पाहणी करतो. या वेळी सहसा कोणीही उठणार नाही, याची खात्री झाल्याने चोर घराच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून हा चोर आतमध्ये येतो. चप्पल स्टॅन्डजवळ जाऊन बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेतो. त्यानंतर चप्पल स्टॅन्डजवळ बसून एक एक बूट त्याच्याजवळ असलेल्या पोत्यात भरतो. पोत्यात भरत असलेला प्रत्येक बूट नामांकित कंपनीचा ब्रँडेड आहे का? हे तो चोर पाहतो.

चोरत असलेला बूट महागडा असल्याची खात्री झाली तरच तो चोरतो. जुन्या चपला, बूट तो अजिबात चोरत नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. एका ब्रँडेड बुटाची किंमत साधारणतः चार ते पाच हजार रुपये आहे. व्यायामासाठी, घरगुती कामासाठी, ऑफिससाठी आणि कार्यक्रमासाठी घातले जाणा-या बुटांच्या किमती काही हजारांच्या घरात आहेत.

  • सेक्टर 26 मधील शांताराम गराडे म्हणाले, “प्राधिकरण सेक्टर 26 मधील पीसीएमसी हाऊसिंग सोसायटीमधील पाच घरांच्या समोरील बूट चोरट्याने चोरून नेले. यापूर्वी देखील याच सोसायटीमध्ये बूट चोराने डल्ला मारला होता. सर्वच घरासमोरचे बूट चोरल्याने नागरिक हैराण झाले आहेत.”

उज्वल कुमार म्हणाले, “मागील तीन-चार महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. चपला बुटांना माती, चिखल लागल्यामुळे आपण त्यासाठी बाहेर व्यवस्था करतो. पण घराबाहेर चपला सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून लक्षात येत आहे. सहा महिन्यांपूर्वी एक महागडी सायकल विकत घेतली होती. सायकल विकत घेऊन 24 तास होण्यापूर्वीच चोरटयांनी सायकल चोरून नेली. चपला, बूट, सायकल या सगळ्याच गोष्टी घरात ठेवू लागलो तर राहायचं कुठं हा प्रश्न निर्माण होईल.”

  • सुभाष जयसिंघानी म्हणाले, “पहाटेच्या वेळी एक बुटचोर परिसरात फिरतो. ज्या घराबाहेर चांगले बूट दिसतील ते बूट तो उचलून नेतो. काही प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. याबाबत पोलिसांकडे लेखी आणि तोंडी तक्रार केली आहे. बूटचोराच्या भीतीने आम्ही दररोज सगळ्या चपला झोपण्यापूर्वी घरात घेतो. सकाळी उठल्या-उठल्या पहिले काम चपला-बूट बाहेर काढण्याचे करतो. पोलीस प्रयत्न करीत आहेत. बुटचोर शोधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आले आहे.”

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले, “बूट चोराची तक्रार निगडी पोलिसांकडे आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी हे प्रकार होत असल्याचे त्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करीत आहेत. लवकरच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात येईल, असा विश्वास देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक टोणपे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.