Nigdi : रावण गॅंगचा मुख्य सूत्रधार ‘ससा’ अँटी गुंडा स्कॉडच्या पिंजऱ्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी आणि दहशत पसरवणा-या रावण गॅंगचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जाणा-या ‘ससा’ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. ही कारवाई पिंपरी-चिंचवडच्या अँटी गुंडा स्कॉडने आकुर्डी येथे केली.

सागर उर्फ ससा राजकुमार वाघमोडे (वय 26, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावण गॅंगचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या खुनानंतर सागर रावण गॅंगचा प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर त्याने शहरात अनेक लहान-मोठे गुन्हे केले. त्याच्यावर पिंपरी-चिंचवड शहरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, मारामारी यांसाखे घातक गुन्हे दाखल आहेत. त्याला जानेवारी 2019 मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

ससा मागील काही महिन्यांपासून पुन्हा गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. जुलै 2018 मध्ये त्याने पिंपरी पोलीस ठाण्यासमोर भर दिवसा वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली होती. त्याचबरोबर त्याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगल, दरोड्याची तयारी, दुखापत, जबर दुखापत, धमकी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. यापूर्वी देखील त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरीही न सुधारल्याने परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सशाला पुन्हा एकदा दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.

शहरातील गुन्हेगारी टोळ्या संपवण्यासाठी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी अँटी गुंडा स्कॉडची स्थापना केली. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्याकडे या पथकाची सूत्रे सोपवली. हे पथक मागील काही महिन्यांपासून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या मागावर आहे. त्यातच ससा आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात आला असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. ससा आकुर्डी परिसरात पिस्तूल घेऊन का फिरत होता. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.