Nigdi : ऑनलाइन जॉब शोधताय, थांबा ! नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन संकेतस्थळावरून नोकरी संदर्भात मेल आला. त्यात दिलेल्या अटींची तरुणाने पूर्तता केली. त्यातूनच वारंवार पैशांची मागणी झाली. तरुणाने वारंवार ही पैशांची मागणी देखील पूर्ण केली. तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपये घेतले. लाखो रुपये घेऊन देखील तरुणाला नोकरी दिली नाही. हा प्रकार निगडी प्राधिकरण येथे 12 सप्टेंबर 2017 ते 8 जानेवारी 2019 या कालावधीत घडला.

जौजफ मोहम्मद अन्वरुल हक शेख (वय 27, रा. प्राधिकरण, निगडी) या तरुणाने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनुप सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याची विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जौजफ या तरुणाला 12 सप्टेंबर 2017 रोजी मॉन्स्टर जॉब्ज डॉट कॉम या ऑनलाइन जॉब पोर्टलवरून नोकरीसंदर्भात मेल आला. नोकरीसाठी आरोपीने त्याच्या बँक खात्यावर पैसे भरण्याची मागणी केली. जौजफने देखील वारंवार आरोपीच्या बँक खात्यावर पैसे भरले. आरोपीने जौजफ कडून तब्बल 5 लाख 61 हजार 308 रुपये घेतले. लाखो रुपये घेऊन देखील जौजफला कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुण नोकरीसाठी प्रत्यक्ष भेटून, ऑनलाइन अर्ज करून अशा विविध माध्यमातून प्रयत्न करतात. त्यात काही जॉब पोर्टल, संकेतस्थळे तरुणांशी अशा प्रकारे धोकेबाजी करतात. त्यामुळे तरुण वर्गात नैराश्य येत आहे. ऑनलाइन जॉब शोधताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या पोर्टलवर जॉब शोधत आहोत, त्या पोर्टलची सुरुवातीला खात्री करा. अन्यथा आपली वैयक्तिक माहिती चोरून तसेच आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या धोक्यांची शक्यता वाटल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.