Nigdi: पुढील सात महिन्यात तीनमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार – आयुक्त हर्डीकर

कामाची निर्धारित मुदत संपली, कामास पुन्हा मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम निर्धारित कालावधीत पूर्ण झाले नाही. कामाची मुदत 26 डिसेंबर रोजी संपली असल्याने या कामास वाढीव मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. दरम्यान, कामाला मुदतवाढ दिली असून पुढील सात ते आठ महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

मुंबईहून पुण्याकडे येताना तसेच, मावळ तालुक्यातून येताना पिंपरी-चिंचवडच्या सुरुवातीचे स्मार्ट सिटीचे प्रवेशद्वार म्हणून भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान चौकाची ओळख आहे. या चौकात चारही बाजूने शहरातील तसेच, बाहेरील अवजड वाहने सातत्याने ये-जा करतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. वाहतूक वर्दळीमुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेक जणांचा बळी गेला आहे.

वाहतूक सुरळीत व अधिक सुरक्षित होण्यासाठी महापालिकेने चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्याच्या कामास सुरूवात केली आहे. या कामासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. कामाची वर्क ऑर्डर बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीला 27 जून 2017 ला देण्यात आली आहे. कामाची निर्धारित मुदत 26 डिसेंबर संपली आहे. त्यामुळे या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. या संथ गती कामामुळे चौकातील वाहतुकीस अडथळा होत असून, दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र अनुषंगिक कामे पूर्ण करून या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी साधारण सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल असा दावा प्रशासनाने केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “भक्ती-शक्तीच्या पुलाच्या कामाला मुतवाढ द्यावी लागणार आहे. या कामास अडथळा ठरणारे अतिउच्च दाब विद्युत वाहिनीचे टॉवर हटविण्याकरिता जास्त कालावधी लागला. पण आता वेगाने काम सुरु आहे. पुढील सात ते आठ महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल”

ग्रेड सेपरेटरमुळे जोडणारा परिसर, त्याचे फायदे

# ग्रेड सेपरेटरमुळे प्राधिकरण ते मोशी जोडणार
# लांबी 420 मीटर, रुंदी 24 मीटर, उंची 5.50 मीटर
# येणा-या व जाणा-या वाहनांसाठी स्वतंत्र लेन
# पुणे-मुंबई रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे थेट वाहतूक
# प्राधिकरणाकडून पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल
# उड्डाण पुलाखालून बीआरटी बससेवा
# वर्तुळाकार रस्ता
# वाहतूक बेटाचा व्यास 60 मीटर, रुंदी 15.5 मीटर
# रोटरीमुळे पादचा-यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्य
# चौक ‘सिग्नल’फ्री असल्याने पादचारी व वाहनांना थांबावे लागणार नाही
# इंधनामध्ये व वाहनचालकांचे वेळेमध्ये बचत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.