Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील तीनमजली उड्डाणपूल वर्षाअखेरीस होणार खुला

चौक असणार 'सिग्नल फ्री'

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे 50 टक्के पूर्ण झाले आहे. वर्षाच्या अखेरीला प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा चौक ‘सिग्नल फ्री’ होईल. त्यामुळे चारही बाजूनी येणारी वाहने वेगाने मार्गस्थ होणार आहेत. चौकातील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. पूल खुला झाल्यास दापोडीतून ग्रेडसेपरटरद्वारे अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात देहूरोडपर्यंत पोहचता येणार आहे.

निगडीतील हा पूल तीन मजली वाहतूक पूल असणार आहे. चौकाजवळच शहराचा मानबिंदू असणारे भक्ती-शक्ती शिल्पसमूह आहे. देशातील सर्वात उंचीचा 107 मीटर उंचीचा तिरंगा फडकत आहे. त्याचे सौंदर्य कोठेही कमी होणार नाही. याची दक्षता पुलाचे काम करताना घेतली जात आहे. उड्डाणपुलाचे क्रॅश बॅरिअर हे भक्ती-शक्ती शिल्पाच्या तळाशी समपातळीमध्ये आहे. यामुळे बसमधील प्रवाशांना देखील पुलावरून संपूर्ण शिल्पाचे दर्शन होणार आहे. ‘सिग्नल फ्री’ चौक केला जाणार आहे. त्याचबरोबर चौकातील प्रत्येक दिशेला जाणारे वाहन समगतीने फिरते राहून चौक ओलांडण्याचे नियोजन केलेले आहे.

निगडीपर्यंत मेट्रो देखील धावणार आहे. त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)ला नुकतीच महासभेने मान्यता दिली आहे. निगडी येथून मेट्रो श्रीकृष्ण मंदिराचे बाजूने फुटपाथच्याकडेने बीआरटीएस टर्मिनलच्या बाजूने नियोजित मेट्रो टर्मिनलकडे जाईल असे नियोजन पुलाच्या आराखड्यामध्ये केलेले आहे. या आराखड्याला कोणतेही हरकत नसल्याचे पुणे मेट्रोने कळविले आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या आराखड्यामध्ये भविष्यातील मोनो रेल, ट्राम याकरीता देखील स्पाईन रस्त्याला समांतर अशी 11.00 मीटर रूंदीची जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे.

या सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करताना रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता पादचा-यांनाही सुरक्षितपणे मार्ग ओलांडता येईल. या उद्देशाने हा तीन टप्प्यांचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने सन 2017 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात केली आहे. बी.जी. शिर्के या ठेकेदार कंपनीकडून 90 कोटी रुपयात हे काम करुन घेतले जात आहे. त्यामध्ये उड्डाण पूल, वर्तुळाकार रस्ता आणि ग्रेडसेपरेटर या कामांचा समावेश आहे. पुलाचे काम वेगात सुरु असून 50 टक्के काम पूर्ण झाले असून वर्षाच्या अखेरीस हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या उड्डाणपुलामुळे शहराच्या सौदर्यामध्ये भर पडणार आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे उपअभियंता विजय भोजने म्हणाले, ”भक्‍ती-शक्ती हा वाहनांच्या गर्दीचा सर्वांत मोठा चौक सिग्नल फ्री होईल. डिसेंबर 2019 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. थेट वाहतूक व पादचा-यांसाठी स्वतंत्र सुविधांमुळे या तीन टप्प्यांच्या प्रकल्पात सर्व बाजूंनी वाहतूक एकाच वेळी सुरू राहणार आहे. विद्युत विभागामार्फेत ग्रेडसेपरेटरच्या आखणीमध्ये येणारी ‘एचटी’ टावर लाईन स्थलांतरित करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होणे अशक्य होणार आहे”.

ग्रेड सेपरेटरमुळे जोडणारा परिसर, त्याचे फायदे

ग्रेड सेपरेटरमुळे प्राधिकरण ते मोशी जोडणार
लांबी 420 मीटर, रुंदी 24 मीटर, उंची 5.5 मीटर
येणा-या व जाणा-या वाहनांसाठी स्वतंत्र लेन
पुणे-मुंबई रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे थेट वाहतूक
प्राधिकरणाकडून पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल
उड्डाण पुलाखालून बीआरटी बससेवा
वर्तुळाकार रस्ता
वाहतूक बेटाचा व्यास 60 मीटर, रुंदी 15.5 मीटर
रोटरीमुळे पादचा-यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्य
चौक ‘सिग्नल’फ्री असल्याने पादचारी व वाहनांना थांबावे लागणार नाही
इंधनामध्ये व वाहनचालकांचे वेळेमध्ये बचत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.