Nigdi: तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज –ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आज (मंगळवारी) उत्साहात स्वागत झाले. निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला. पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे. उद्या (बुधवारी) पालखी पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी रथाचे सारथ्य केले.

देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर अनगडशहाबाबा दर्गा येथे पहिली अभंगआरती झाली. चिंचोली पादुका येथे दुसरी अभंगआरती झाली. माळवाडी, झेंडेमळा, देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून आणि देहूकरांचा निरोप घेऊन पुणे-मुंबई महामार्गाने पालखी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात पोहोचली. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारक-यांची रांग, टाळ-मृदंगाचा गजर आणि रिमझिम पावसात आनंदाला आलेली भरती असे मनमोहक दृश्य शहरवासियांना अनुभवयास मिळाले.

  • महापालिकेतर्फे पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना मृदुंगाची भेट देऊन सत्कार करण्यात आला. महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

स्वागत झाल्यानंतर पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात विसावली. बुधवारी (दि.26) पहाटे पाच वाजता ती पुण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या वतीने पालखीनिमित्त पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच वारक-यांना राहण्यासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.