Nigdi: भाजप नगरसेवकाने औषध फवारणी कर्मचा-याच्या श्रीमुखात भडकवले !

सफाई कर्मचा-यांच्या गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी यमुनानगर चौकीत ठिय्या

एमपीसी न्यूज – भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औषध फवारणी करणा-या कर्मचा-याच्या कानशिलात लगाविली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सफाई कर्मचारी यमुनानगर पोलीस चौकीत जमा झाले आहेत. गुन्हा दाखल करावा यासाठी त्यांनी चौकीत ठिय्या मांडला आहे. हा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी दहाच्या सुमारास यमुनानगरमध्ये घडली.

गणेश जगताप असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचा-याचे नाव आहे. जगताप हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. औषध फवारणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जगताप आज सकाळी निगडी, यमुनानगरमध्ये औषध फवारणी करत होते. त्यावेळी तिथे आलेले भाजपचे स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे यांनी आपल्या कानशिलात लगाविली. तसेच हात देखील पिरगळला आहे, असा आरोप जगताप यांनी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सफाई कर्मचा-यांनी यमुनानगर चौकीत ठिय्या मांडला आहे.

नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले, “यमुनानगर परिसरात गेल्या तीन महिन्यापासून औषधाची फवारणी केली नाही. त्यामुळे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जगताप हा फवारणी करण्याऐवजी झाडाखाली बसला होता. तसेच उद्धटपणे देखील बोलला. त्यामुळे दोन कानाखाली मारल्या आहेत”

या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे, फौजदार एस.वाय. होळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.