Nigdi Crime Update: भांडण सोडविल्याच्या कारणावरून ओटास्कीम येथे एकाचा खून; चारजण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – ओटास्कीम निगडी येथे एकाचा खून झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री घडली. भांडण सोडविल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

संपत भीमराव गायकवाड (वय 45, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत चाळ, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संध्या संपत गायकवाड (वय 36) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेत वैभव उर्फ बोचू संतोष अडागळे, युवराव संतोष अडागळे, ओमकार बाळू अडागळे, चेतन बाळू अडागळे, संतोष अडागळे (सर्व रा. अण्णाभाऊ साठेनगर चाळ नंबर दोन, ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संपत गायकवाड यांनी आरोपी आणि इतर मुलांचे भांडण सोडवले होते. त्याच कारणावरून आरोपींनी गायकवाड यांच्या घरावर दगड मारले असता गायकवाड यांनी आरोपींच्या घरासमोर जाऊन ‘तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले’ असा जाब विचारला.

या कारणावरून आरोपी वैभव याने सिमेंटच्या गट्टूने गायकवाड यांच्या कपाळावर जोरात प्रहार केला तर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गायकवाड यांना ठार मारले. दरम्यान, आरोपी संतोष याने गायकवाड यांचे जमिनीवर पडलेले रक्त पाणी टाकून धुवून पुरावा नष्ट केला.

वैभव उर्फ बोचू संतोष अडागळे, युवराव संतोष अडागळे, ओमकार बाळू अडागळे, चेतन बाळू अडागळे या चौघांना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.