Nigdi : ‘कलारंग’च्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत

एमपीसी न्यूज – कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. प्रसिद्ध मुलाखतकार व संवादक समीरन वाळवेकर हे नाना पाटेकर यांची मुलाखत घेणार आहेत. बुधवारी (दि. 22) दुपारी पाच वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवडचे संस्थापक अमित गोरखे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सुप्रिया ढाईजे, आशा नेगी, शैलेश लेले, संकेत लोंढे, रमेश शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

कलारंग ही संस्था मागील 20 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांना सन्मानित करण्यात आले आहे. 21 व्या वर्षात पदार्पण करत असताना सिने, नाट्य व नाम फाउंडेशन द्वारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे नाना पाटेकर यांच्या मुलाखतीचा योग साधण्यात आला आहे. नानांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवास या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे.

कार्यक्रमात काही स्थानिक कलाकारांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी डॉ. पी डी पाटील, खासदार अमर साबळे, महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, भाऊसाहेब भोईर, उमा खापरे, तुषार हिंगे, एकनाथ पवार, विलास मडेगिरी, मधुकर बाबर आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. मात्र, यासाठी प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. मोफत प्रवेशिका घेण्यासाठी नॉव्हेल्स एन आय बी आर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, निगडी येथे सकाळी नऊ ते पाच या वेळेत (9881540066/ 9881520066) संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.