Nigdi : भाजप पदाधिका-याची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

सुहास उभे (फेसबुक अकाऊंटधारक, पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), नीता ढमाले, संजय अवसरमल, सागर गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल विनायक थोरात (वय 36, रा. सेक्टर नंबर 27 अ, कॅम्प एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे. निगडी पोलिसांनीही 18 एप्रिल रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर कारवाई केली. त्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले. कारवाई झालेल्या नागरिकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधले असल्याचे दिसत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

त्यातील एक फोटो भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांचा असल्याचे सांगत सुहास उभे यांनी थोरात यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहून तो आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसेच या पोस्टमध्ये अमोल थोरात यांचा मूळ फोटोही आहे. याप्रकरणी थोरात यांनी निगडी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती.

पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा करून सुहास उभे यांच्यासह नीता ढमाले, संजय अवसरमल, सागर गायकवाड तसेच इतरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संजय अवसरमल यांच्या फेसबुक अकाऊंटवर ते राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी ब्लॉक कमिटी अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे.

तसेच चिंचवडमधील निता ढामाले या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्या म्हणून समजल्या जातात. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.