Nigdi: नगरसेवक चिखले आणि पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे परप्रांतीयांसह राज्यातील नागरिक पोहोचले स्वगृही

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे निगडी-यमुनानगर परिसरात अडकलेल्या राज्यातील आणि परप्रांतीय नागरिकांना निगडी पोलीस आणि मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पाठपुरावा करत त्यांनी आपल्या गावी पाठविले आहे. सध्या हे नागरिक आपापल्या घरी पोहोचले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लागू केलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या 45 दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. यामुळे हजारो कामगार, विद्यार्थी, पर्यटक शहरात अडकून पडले आहेत.

त्याचबरोबर परप्रांतीय कामगार पायी चालत निघाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात बाहेरच्या राज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक वास्तव्यास आहेत.

लॉकडाउनमुळे परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले आहेत. अनेकांना आपापल्या मूळगावी परतायचे आहे. परंतु, गावी जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे या नागरिकांना शहरात अडकून पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

प्रभाग 13, निगडी-यमुनानगर परिसरात या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांना त्यांच्या गावी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी मूळगावी जाण्याची इच्छा असणाऱ्या परप्रांतीयांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची यादी बनविण्याचे काम स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांनी निगडी पोलिस ठाण्यातील प्रशासनासोबत केले.

त्या अनुषंगाने आतापर्यंत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, केरळ, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील 580 नागरिकांपैकी 500 लोक आप-आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत, अशी माहिती चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या मदतकार्यात निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, लक्ष्मण सोनवणे, केरबा माखणे, श्रावण गोयल, जोसना रामपाल, तसेच डॉ. पाचपांडे, डॉ. करडे, डॉ. नितीन जाधव, डॉ. लबडे यांनी सर्व नागरीकांची आरोग्य तपासणीची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली.

सचिन चिखले मित्र परिवार, कार्यकर्ते व आदींनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.