Nigdi : आत्महत्या केलेल्या महिलेच्या विरोधात चक्क फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – नेकांची फसवणूक करून मुलगा पळून गेला. मात्र देणेकऱ्यांनी त्याच्या आईला आणि अपंग मावशीला पैशासाठी त्रास दिला. या त्रासाला कंटाळून दोन सख्ख्या बहिणींनी विष प्राशन केले. त्यापैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर देणेकऱ्यांनी चक्क आत्महत्या केलेल्या मृत महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही घटना निगडी येथे घडली आहे.

चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर (वय 34, रा. त्रिवेणीनगर तळवडे) आणि मंगला गोकुळ नार्वेकर (वय 55) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील मंगला यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी प्रवीण पर्वतराव बराटे (वय 50, रा. मु.पो. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रशेखर आणि त्याची आई मंगला यांनी फिर्यादी यांची मुलगी शैलेजा हिला महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात सहाय्यक पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना प्रशासन अधिकारी, आस्थापना, पिंपरी चिंचवड मनपा, यांची खोटी सही व दस्तावेज तयार करून बनावट नियुक्ती पत्र देऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारी फसवणुकीचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र यातील आरोपी मंगला नार्वेकर यांनी देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ६ मार्च रोजी आपल्या अपंग बहिणीसह विषप्राशन केले. उपचारादरम्यान रविवारी मंगला नार्वेकर यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी मंगला यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्रास देणाऱ्यांची नावे लिहिली आहेत. त्यानंतर सोमवारी प्रवीण बराटे यांनी चंद्रशेखर नार्वेकर आणि त्याची आई मंगला नार्वेकर यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.