Nigdi : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाचवल्या एअर रायफल व तलवारी

परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह 250 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निगडी परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये कार्यकर्त्यांनी एअर रायफल व तलवारी नाचवल्या. हा प्रकार रविवारी (दि. 2) दुपारी पाच ते रात्री दहा या कालावधीत अंकुश चौक ते ठाकरे मैदान यमुनानगर येथे घडला. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 250 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांच्यासह अन्या 250 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकास नीलचंद दुधे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पाचच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अंकुश चौक  ते ठाकरे मैदान यमुनानगर यादरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये चार मुलींच्या हातामध्ये एअर रायफल होत्या. त्याचे ट्रिगर दाबताच त्यातून आवाज येत असे. तसेच पाच मुलींच्या हातामध्ये तलवारी होत्या. ही रॅली विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विनापरवाना काढण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात शस्त्र बाळगण्यास बंदी असताना कार्यकर्त्यांनी शस्त्र बाळगली. याबाबत सर्वांवर भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.