Nigdi Corona News : विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास थेट ‘सीसीसी’ सेंटर

आकुर्डी दवाखान्याकडून 590 जणांची टेस्ट, 8 जण पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आकुर्डी दवाखाना आणि निगडी पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 590 जणांची आज (शनिवारी) कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आलेल्या 8 जणांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचारासाठी दाखल केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांच्या संचारावर बंदी आणली आहे. शनिवार, रविवार तर पूर्णपणे विकेंड लॉकडाऊन असतो. असे असतानाही काहीजण विनाकारण बाहेर फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होतो.

त्यासाठी महापालिकेच्या आकुर्डी दवाखान्याच्या वतीने आज (शनिवारी) निगडीतील मधुकर पवळे पुलाखाली विनाकारण फिरणाऱ्या 590 नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातील 8 जण पॉझिटिव्ह आले असून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) उपचारासाठी दाखल केले आहे. तर, पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

याबाबत आकुर्डी दवाखान्याच्या प्रमुख डॉ. सुनीता साळवे म्हणाल्या, “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अत्यावश्यक बाबी सोडता अजिबात बाहेर पडू नये. सध्या परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून बेड, ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन सर्वच गोष्टीचा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

नाकाबंदीच्या ठिकाणी महापालिका कोरोना चाचणी करते. कोणाला शिक्षा म्हणून चाचणी केली जात नाही. अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण, ते कोरोना पॉझिटिव्ह असतात. लक्षणे नसल्याने पॉझिटिव्ह असतानाही ते फिरत असतात. सर्वांशी मिसळत असतात. अशा लोकांचे कोरोनाचे लवकर निदान होऊन त्यांना तत्काळ आयोसोलेट करण्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये रँडम टेस्टिंग केल्या जातात. पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते”.

निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड म्हणाले, ” विनामस्क फिरणारे, डबलसीट, वाहतूक नियमांचे उल्लंघन, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या सुमारे 80 ते 85 जणांवर दंडात्मक कारवाई केली. डबलसीट 22, आस्थापना 7, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 55 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.