Nigdi: ….तर मारहाण करणा-या उत्तम केंदळे यांचे नगरसेवकपद रद्द करणार – आयुक्त हर्डीकर

आयुक्तांनी मागविला अहवाल

एमपीसी न्यूज – औषध फवारणी करणा-या कर्मचा-याला नगरसेवकाने मारहाण केलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती मागविली आहे. मारहाण केल्याचे स्पष्ट झाल्यास नगरसेवकावर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल. त्यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई केली जाऊ शकते, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘एमपीसी न्यूजशी’ बोलताना सांगितले.

निगडी प्रभागाचे भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी गुरुवारी (दि.25) महापालिकेच्या औषध फवारणी करणा-या गणेश जगताप या कर्मचा-याच्या कानशिलात लगाविली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कर्मचा-यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला आहे. जगताप हा फवारणी करण्याऐवजी झाडाखाली बसला होता. तसेच उद्धटपणे देखील बोलला. त्यामुळे त्याला कानशिलात मारल्याचे केंदळे यांनी सांगितले होते.

याबाबत विचारले असता आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘निगडीत औषध फवारणी करणा-या महापालिका कर्मचा-याला नगरसेवकाकडून मारहाण झालेल्या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. प्रशासनाच्या वतीने त्याची संपूर्ण माहिती घेतली जाईल. पोलीस खात्याकडून तक्रार नोंद झाली असल्याची माहिती मला मिळाली आहे. त्याची संपूर्ण माहिती मी मागविली आहे. मारहाण केल्याचे निदर्शनास आल्यास नगरसेवक केंदळे यांच्यावर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.