Nigdi : भर रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन मैत्रिणी मोपेड दुचाकीवरून जात असताना दोन तरुणांनी त्यांना भर रस्त्यात अडवले. तरुणांनी त्यांच्याशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. अशी फिर्याद 19 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेनऊच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

नाझीम अन्सारी (वय 24, रा. ओटास्कीम, निगडी), कुणाल गायकवाड (वय 22, रा. अजंठानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी 19 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथून मोपेड दुचाकीवरून त्यांच्या मैत्रिणीसोबत जात होत्या. भर रस्त्यात फिर्यादी महिलेच्या मोपेड दुचाकीला आरोपी तरुणांनी त्यांची दुचाकी आडवी लावून अडवले. आरोपींनी फिर्यादी महिलेचा मोबाईल फोडून नुकसान केले. तसेच त्यांच्याशी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला, अशी फिर्यादी दाखल करण्यात आली असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.