Nigdi Crime : वर्चस्ववादातून गोळीबार प्रकरणी 17 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; पोलीस आयुक्तांची घटनास्थळी भेट

एमपीसी न्यूज – वर्चस्ववादातून 17 जणांनी मिळून पिस्तुल, पालघन, कोयता, बांबू, दगड घेऊन परिसरात दहशत माजवली. तसेच दोघा भावांना मारहाण करत एका भावावर गोळी झाडली. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ घडली.

याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांचा भलामोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही घटनास्थळी भेट दिली.

किरण शिवाजी खवले (वय 28), यश अतुल कदम (वय 20), विजय शिंदे उर्फ चोरगुंड्या (वय 32), प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे (सर्व रा. ओटास्कीम, निगडी), रोहन चंडालीया (वय 24, रा. जाधववाडी, चिखली), मनोज हाडे (वय 25, रा. चिखली) आणि अन्य 10 जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 324, 323, 141, 143, 147, 148, 149, आर्म ऍक्ट, क्रीमनल अमेंडमेंट ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बसवराज दोडमणी (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर गोळीबार झाला आहे. त्याच्यासह त्याचा भाऊ रवी बसवराज दोडमणी (वय 26) हा देखील जखमी झाला आहे. याबाबत आकाश याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

फिर्यादी आणि आरोपी यांच्यात परिसरावरील वर्चस्ववादातून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. आरोपी आपसात संगनमत करून बुधवारी रात्री ओटास्कीम येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ आले. तिथे त्यांनी फिर्यादी आकाश यांचा भाऊ रवी याला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. हे पाहण्यासाठी फिर्यादी आकाश जात होते.

त्यावेळी आरोपी यश, रोहन, मनोज यांनी ‘तू तिथंच थांब तुला गोळी घालून ठार मारतो’ अशी धमकी दिली. तसेच पिस्तूलातून गोळी झाडली. यात आकाश यांच्या पायाला गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा भाऊ रवी देखील जखमी झाला आहे. आरोपींनी परिसरात दहशत पसरवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील, डॉ. सागर कवडे या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणातील काहीजण सराईत गुन्हेगार असल्याने या प्रकरणाचा संबंध कुख्यात रावण टोळीशी जोडला जात आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.