Nigdi Crime : दगडाने ठेचून मोठ्या भावाचा निर्घृणपणे खून; लहान भावाला अटक

एमपीसी न्यूज – सख्ख्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने मारून निर्घृणपणे खून केला. ही घटना बुधवारी (दि. 2) रात्री दहा वाजता खान्देश मराठा मंडळाच्या जवळ, निगडी येथे घडली. निगडी पोलिसांनी आरोपी लहान भावाला अटक केली आहे.

सोमनाथ सुरेश नाईकवडे (वय 32) असे अटक केलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. विश्वनाथ सुरेश नाईकवडे (वय 35, रा. चिकन चौक, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयत विश्वनाथ यांची आई सखुबाई सुरेश नाईकवडे (वय 65) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ आणि मयत विश्वनाथ हे सख्खे भाऊ आहेत. सोमनाथ याला दारूचे व्यसन आहे. त्यावरून सोमनाथ आणि मयत विश्वनाथ यांच्यात वारंवार भांडण होत होते. त्यांचे घर अतिशय लहान आहे. त्यामुळे सोमनाथ आणि विश्वनाथ घराबाहेर कुठेही झोपत असत. बुधवारी रात्री निगडी, प्राधिकरण येथील खान्देश मराठा मंडळाजवळ साफल्य बंगल्यासमोरून जात असताना रस्त्याच्या दुभाजकावर विश्वनाथ आणि सोमनाथ यांचे पुन्हा भांडण झाले. त्यातून सोमनाथ याने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने ठेचले. त्यात विश्वनाथचा मृत्यू झाला.

गुरुवारी (दि. 3) पहाटे चार वाजता याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर निगडी पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून आरोपी भावाला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.