Nigdi Crime : वर्चस्ववादातून गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक

ओटास्किम येथे 17 जणांच्या टोळक्याने राडा घालत वर्चस्ववादातून केला होता गोळीबार

एमपीसी न्यूज – वर्चस्ववादातून दोघांना मारहाण करत एकवार गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि. 25) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह चार जणांना अटक केली आहे.

विजय शिंदे उर्फ चोरगुंड्या (वय 32), यश उर्फ रघु अतुल कदम (वय 20), प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे (सर्व रा. ओटास्कीम,निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह शिवाजी खवले (वय 28), रोहन चंडालीया (वय 24, रा. जाधववाडी, चिखली), मनोज हाडे (वय 25, रा. चिखली) आणि अन्य 10 जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 324, 323, 141, 143, 147, 148, 149, आर्म ऍक्ट, क्रीमनल अमेंडमेंट ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बसवराज दोडमणी (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा भाऊ रवी बसवराज दोडमणी (वय 26) हा देखील जखमी झाला आहे. याबाबत आकाश याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी यांच्यात परिसरावरील वर्चस्ववादातून मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. आरोपी आपसात संगनमत करून बुधवारी रात्री ओटास्कीम येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ आले. तिथे त्यांनी फिर्यादी आकाश यांचा भाऊ रवी याला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. हे पाहण्यासाठी फिर्यादी आकाश जात होते.

त्यावेळी आरोपी यश, रोहन, मनोज यांनी ‘तू तिथंच थांब तुला गोळी घालून ठार मारतो’ अशी धमकी दिली. तसेच पिस्तूलातून गोळी झाडली. यात आकाश यांच्या पायाला गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा भाऊ रवी देखील जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत पसरवली.

आरोपी चोरगुंड्या याच्यावर घरफोडी, चोरी, मारहाण, जबरी चोरी, वाहनचोरीचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर सीआरपीसी 110 (अ) (ग) नुसार 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 13 नोव्हेंबर 2020 रोजी चोरगुंड्या याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव पाठवला आहे.

सराईत गुन्हेगार चोरगुंड्या याच्यासह चार जणांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.