Nigdi Crime : बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपी विचारून केली आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बँकेतून बोलत असल्याचे सांगून डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचे सांगत एका व्यक्तीकडून ओटीपी नंबर घेतला. त्याआधारे त्या नागरिकाच्या बँक खात्यातून सात लाख 98 हजार 998 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. हा प्रकार निगडी गावठाण येथे घडला.

शिवराम गोपाल वैद्य (वय 57, रा. निगडी गावठाण) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8016054590 या मोबईल क्रमांकवरून बोलणा-या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे 2020 रोजी फिर्यादी वैद्य यांना 8016054590 या मोबईल क्रमांकवरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण आयसीआयसीआय बँक, बांद्रा ऑफिस, मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड ब्लॉक होणार आहे. त्यासाठी तुमचे फिंगरप्रिंट लागणार आहेत. तुमचे फिंगरप्रिंट घेण्यासाठी आमच्या ऑफिसमधून लोक येतील. परंतु त्याआधी मी विचारेल ती संपूर्ण माहिती द्या. तुमच्या मोबईलवर मेसेज येईल त्याची देखील पूर्ण माहिती द्या. असे आरोपीने फिर्यादी वैद्य यांना सांगितले.

वैद्य यांच्या मोबईल फोनवर आलेल्या मेसेज मधील ओटीपी आरोपीने विचारला. वैद्य यांनी तो सांगितला. त्या आधारे आरोपीने वैद्य यांच्या बँक खात्यातून सात लाख 98 हजार 998 रुपये परस्पर ट्रान्सफर करून वैद्य यांची फसवणूक केली. याबाबत 21 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.