Nigdi crime News : कोरोनावरील रेमडीसीवीर इंजेक्शन चढ्या दराने विकल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनावर उपचारासाठी अत्यावश्यक असलेले रेमडीसीवीर या इंजेक्शनची चढ्या दराने, बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या तीन जणांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे.

शाहिद जब्बार शेख (वय 34), विजय बबन रांजणे (35), वैष्णवी राजेंद्र टाकोरकर (वय 30, तिघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मुस्ताफा अब्दुलगफार तांबोळी (वय 19, रा. चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडीसीवीर हे इंजेक्शन फिर्यादी यांना मिळत नव्हते.

आरोपी शाहिद हा स्टार हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याने अनाधिकृतरीत्या औषध विक्रीचा कोणताही परवाना नसताना चढ्या दराने फिर्यादी यांना इंजेक्शनची विक्री केली. रेमडीसीवीर इंजेक्शनची मूळ किंमत 5 हजार 400 रुपये असताना आरोपीने फिर्यादी यांच्याकडून दोन इंजेक्शनचे 15 हजार 500 रुपये घेतले.

फिर्यादी यांच्या मित्राच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांना स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना देखील उपचारासाठी रेमडीसीवीर या इंजेक्शनची गरज होती. त्यावेळी आरोपी शाहिदच्या अन्य दोन साथीदार आरोपींनी फिर्यादी यांच्या मित्राच्या वाडीलांच्या उपचारासाठी 6 हजार रुपये प्रत्येक इंजेक्शन या दराने विक्री केली.

याबाबत फिर्यादी यांनी मंगळवारी निगडी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावर चौकशी करत पोलिसांनी तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.