Nigdi Crime News : एक महिन्यानंतरही ‘त्या’ घरफोडीचा तपास लागेना; सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिसांची तपासासाठी उदासीनता

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरून नेला. घरफोडी होऊन तब्बल एक महिना उलटून गेला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. मात्र, निगडी पोलिसांच्या उदासीनतेमुळे तपास पुढे जात नाही, अशी खंत फिर्यादी वृद्ध महिलेने व्यक्त केली आहे.

कुसुम शिवाजीराव माने (वय 70, रा. विठ्ठल मंदिराच्या मागे, आकुर्डी) यांनी याबाबत 13 सप्टेंबर रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी माने यांची दोन्ही मुले पुण्यात राहतात. एक मुलगी पिंपरीत तर दुसरी मुलगी आकुर्डी येथे माने यांच्या घराजवळ राहते.

कोरोनाच्या संकट काळात माने यांची देखभाल करण्यासाठी घरी कोणी नसल्याने त्या आकुर्डी येथील आपल्या मुलीच्या घरी राहत होत्या. दिवसातून एखाद्या वेळी घरी येऊन घराची साफसफाई, देवपूजा करून त्या पुन्हा मुलीच्या घरी जात होत्या.

12 सप्टेंबर रोजी त्यांनी घराची सफाई आणि देवपूजा केली आणि दुपारी एक वाजता घर बंद करून मुलीकडे गेल्या. 13 सप्टेंबर रोजी त्यांच्या शेजारी राहणा-या एका व्यक्तीने माने यांच्या मुलीला फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली.

चोरट्यांनी घरातून एक लाखाचा सोन्याचा बकुळी हार, 80 हजारांची सोन्याची मोहन माळ, 50 हजारांचे सोन्याचे नेकलेस, 80 हजारांचे सोन्याचे तोडे, एक लाखाच्या दोन पाटल्या, 20 हजारांची सोन्याची साखळी, 74 हजारांच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, 4 हजारांचा सोन्याचा बदाम, एक लाख 12 हजार रोख रक्कम, 100 रुपयांची एफडीची पावती, असा एकूण 6 लाख 26 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले.

13 सप्टेंबर रोजी याबाबत माने यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे यांच्याकडे या घटनेचा तपास आहे. घटना घडल्यापासून कोकाटे यांनी फिर्यादी यांच्याशी काहीही संपर्क साधला नाही.

माने यांच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यात चोरटे दिसत आहेत. तरीदेखील केवळ निगडी पोलिसांच्या उदासीनतेमुळे हा तपास बारगळला असल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे.

तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी याप्रकरणात लक्ष घालून तपास करण्याच्या सूचना देतो, असे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.