Nigdi Crime News : ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात’ म्हणणारा स्वयंघोषित भाई पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पैलवानी आवेशात मांडी ठोकून ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात’ असे म्हणत व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या स्वयंघोषित भाईला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय 21, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मयूर याने सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यामध्ये त्याने कोयता दाखवून दहशत निर्माण केली होती. तर तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने ‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात’, असे म्हणत थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. हे व्हिडीओ बुधवारी (दि. 14) सोशल मीडियावर व्हायरल झाले.

याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढली आणि त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मयूर याच्यावर यापूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे.

सोशल मीडियावर हत्यारे दाखवून व्हिडीओ बनवणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडीओ अपलोड करणे, टेक्स्ट आणि फोटोद्वारे समाजात दहशतीचे वातावरण पसरवणा-या कथित, स्वयंघोषित भाईंवर पिंपरी चिंचवड पोलीस नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर कुठलाही अनुचित प्रकार आढळल्यास पोलीस तात्काळ कारवाई करून त्याला पोलिसांचा इंगा दाखवत आहेत.

पैलवानी आवेशात मांडी थोपटणारा मयूर आता पोलिसांपुढे हात जोडून बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.