Nigdi Crime News : टोळी युद्धातून तरुणाचा चॉपरने भोकसून खून

एमपीसी न्यूज – निगडीमधील ओटास्कीम येथे सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा चॉपरने भोकसून खून केला. हा प्रकार टोळीयुद्धातून झाल्याचे म्हटले जात आहे. ‘काय रे कोठे चाललाय’ असे विचारल्याच्या तत्कालीन कारणावरून हा खून झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री घडली.

आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे (वय 24, रा. भीमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भरत दिलीप लोंढे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सोहेल संतोष जाधव (वय 18), हेमंत खंडागळे (वय 18), गणेश धोत्रे (वय 18), यश उर्फ गोंदया खंडागळे (वय 19), वैभव वावरे (वय 21), श्रवण कु-हाडे (वय 18, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल याला मयत आकाश याने ‘काय रे कोठे चाललाय’ असे रागात विचारले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी ओटास्कीम येथे अण्णाभाऊ साठे वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी आणि मयत आकाश बोलत थांबलेले असताना आकाशला पकडले.

सोहेलने लोखंडी चॉपर आकाशच्या पोटात खुपसला. गणेश धोत्रे याने कोयता उगारून शिवीगाळ केली तसेच परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले.

सुरुवातीला या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जखमी आकाशचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार टोळी युद्धातून झाल्याचे म्हटले जात आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.