Nigdi Crime News : बिल्डरच्या कार्यालयाबाहेर ठेकेदाराने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – कामाचे पैसे मिळण्यासाठी ठेकेदाराने बिल्डरच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. तरीही बिल्डरने पैसे न दिल्याने ठेकेदाराने चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन केले. ठेकेदाराला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान ठेकेदाराचा मृत्यू झाला.

हा प्रकार मंगळवार (दि. 24) सकाळी दहा ते बुधवार (दि. 25) सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पाटील प्लाझा, चिंचवड येथे बिल्डरच्या ऑफिसबाहेर घडला.

राजेश जगदीशप्रसाद अगरवाल, संतोष रामअवतार अगरवाल, राहुल भंडारी, अजित सुभाष गायकवाड, अभिजित गायकवाड, सचिन किल्लेदार, ललित जैन आणि अन्य जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनोद भाऊराव पाटील (वय 48, रा. जळगाव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रवीण पंडीत पाटील असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रवीण पाटील हे बिल्डरांकडून ठेकेदारी पद्धतीने काम घेत. मात्र शहरातील काही बिल्डरांनी काम झाल्यावरही प्रवीण यांच्या कामाचे पैसे दिले नाहीत. त्यापैकी एक असलेले अगरवाल यांच्याकडे त्यांनी कामाचे पैसे मिळावेत, यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र प्रवीण यांना पैसे मिळाले नाहीत.

त्यामुळे प्रवीण यांनी मंगळवार (दि. 24) पासून चिंचवड स्टेशन येथील अगरवाल यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दिवसभर थांबूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास प्रवीण यांनी विषारी औषध प्राशन केले. प्रवीण यांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समजताच त्यांना चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण यांनी चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये आरोपींची नावे आहेत. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420, 306, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून बांधकामाचे पैसे न देता प्रवीण पाटील यांची एक कोटी 94 लाख एक हजार 616 रुपयांची फसवणूक केली. तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.