Nigdi Crime News : ओटास्कीम गँगवॉरमधील अकरा आरोपींना बेड्या; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

एमपीसी न्यूज – निगडी परिसरातील ओटास्कीम येथे 19 आणि 20 एप्रिल रोजी झालेल्या गँगवॉरमधील 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गँगवॉरमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग असल्याने मुलांच्या घडण्याच्या वयात बिघडण्याचे संकेत मिळत आहेत.

19 एप्रिल रोजी भरत दिलीप लोंढे, त्याचा मावस भाऊ आकाश ऊर्फ सोन्या कांबळे तसेच त्यांचे मित्र मोन्या साठे आदी पीसीएमसी कॉलनी ओटास्किम येथे समाज मंदिर गार्डनमध्ये गप्पा मारत उभे होते. त्या ठिकाणी सोहेल जाधव, हेमंत खंडागळे, यश ऊर्फ गोंद्या खंडागळे, वैभव वावरे, श्रवण कुऱ्हाडे हे समाज मंदिराच्या दिशेन आले.

आकाश ऊर्फ मोन्या कांबळे याने सोहेल जाधव यास “काय रे कोठे चाललाय” असे रागाने विचारले. सोहेल याने ‘आम्ही समाज मंदिर येथे कबुतर पाहायला चाललोय’ असे उत्तर दिले.

त्यानंतर रात्री पावणे नऊ वाजता भरत दिलीप लोंढे व त्याचे मित्र गप्पा मारत असताना अचानक सोहेल जाधव, हेमंत खंडागळे, यश ऊर्फ गोंद्या खंडागळे, वैभव वावरे, श्रवण कुऱ्हाडे, निखिल धोत्रे यांनी आकाश ऊर्फ मोन्या याला पकडून सोहेल जाधव याने लोखंडी चॉपरसारख्या धारदार हत्याराने आकाशच्या पोटात खुपसुन त्याच्यावर खुनी हल्ला केला.

त्यानंतर गणेश धोत्रे याने लोखंडी कोयता उगारून शिवीगाळ केली आणि आरोपी पळून गेले. जखमी आकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याप्रकरणी सुरुवातीला खुनाचा प्रयत्न आणि नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर 20 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास या भांडणाचा राग मनात धरुन मयत आकाशचे साथीदार अविनाश राहुल धोंगडे, निखिल रामदास साळवे, संतोष गणेश वाल्मिकी, प्रसाद नंदकुमार बहुले, दुर्वेश दत्ता भिंगारे, साहिल गुलाब शेख, योगेश ऊर्फ किडक्या राजभोग, गुढग्या सन्या, दिपक विजय घडसिंग, प्रविण लक्ष्मण कोंढाळकर यांनी एक रिक्षा व दोन मोटारसायकलवरुन येऊन शक्तिमान कांबळे व रुपेश खवळे यांना काठ्या लाठ्यांनी मारहाण केली.

त्यावेळी रुपेश खवळे पळून गेला. शक्तिमान कांबळे हा तिथून पळून जात असताना एका सोसायटी समोर पडल्याने त्याला वरील आरोपींनी हातातील काठ्यालाठ्यांनी मारहाण करुन आरोपी गुढग्या ऊर्फ सन्या याने सिमेंट ब्लॉकने डोक्यात मारहाण करुन खून करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली. या पथकांनी 19 एप्रिल रोजी घडलेल्या खुनाच्या घटनेतील तिघांना अटक केली. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर 20 एप्रिल रोजी झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.