Nigdi Crime News : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नेमणुकीस असल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज – विनामास्क फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अडवले आणि दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर त्या बहाद्दराने आपण इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) दिल्लीमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली आणि तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि तो तोतया आयबी पोलीस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निगडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

प्रतीक सुनील भावसार (वय 25, रा. वाकड) असे तोतया आयबी पोलिसाचे नाव आहे.

आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार सोपान बोधवड यांना एक तरुण दुचाकीवरून (एम एच 12 / एम एस 3035) विनामास्क आल्याचे दिसले.

_MPC_DIR_MPU_II

बोधवड यांनी तरुणाला थांबवले आणि मास्क न वापरल्या बद्दल 500 रुपये दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर तरुणाने आपण आयबी दिल्ली मध्ये कार्यरत असल्याचे सरळसोटपणे सांगितले.

बोधवड यांनी तरुणाकडे ओळखपत्र मागितले असता त्याने आयबीमध्ये कार्यरत असल्याने ओळखपत्र दाखवून ओळख सांगता येत नसल्याचे सांगितले. त्याचा संशय आल्याने बोधवड यांनी वरिष्ठांना माहिती दिली.

वरिष्ठांनी थेट आयबीमध्ये संपर्क करून संबंधित तरुणाची माहिती काढली. मात्र, असा कोणताही तरुण आयबीमध्ये कार्यरत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.