Nigdi Crime News : ओटास्कीममध्ये भरदिवसा पावणे चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – ओटास्किम, निगडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी पावणे चार लाखांची घरफोडी केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला असून शनिवारी (दि. 6) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा सचिन शिंदे (वय 22, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, ओटास्कीम, निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बाहेरगावी गेल्या होत्या. गावाहून त्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता परतल्या. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने शिंदे यांच्या घराचे कुलूप उघडले. घरातील कपाटातून तीन लाख 76 हजार 500 रुपये किमतीचे 125 ग्रॅम सोन्याचे आणि पाच ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून दिले. फिर्यादी शिंदे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.