Nigdi Crime News : सायबर कॅफेसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – सायबर कॅफे सुरु करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहिता गरोदर असताना सास-याने दिलेल्या गोळ्या पतीने विवाहितेला देऊन तिचा गर्भपात केला.

ही घटना 26 जून 2020 ते 23 जानेवारी 2021 या कालावधीत साईनाथ नगर, निगडी येथे घडली.

पती मुबीन मेहबूब शेख (वय 26), सासू वाहेदा मेहबूब शेख (वय 46), सासरे मेहबूब हुसेन शेख (वय 49), दीर मोईन मेहबूब शेख (वय 23, सर्व रा. पिंपरी), मामे सासरे अहमद शेख (रा. तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती आरोपी मुबीन हे साईनाथ नगर, निगडी येथे भाड्याच्या घरात राहत होते. तिथे पती मुबीन याने विवाहितेला मारहाण केली. तर सासू सास-यांनी फोनवर शिवीगाळ करून तिचा छळ केला.

तसेच मुबीन याला सायबर कॅफे सुरु करायचे असल्याने त्यासाठी विवाहितेने माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, अशी आरोपींनी मागणी केली. वारंवार पैशांची मागणी करून विवाहितेला त्रास दिला.

त्यानंतर पीडित विवाहिता दोन महिन्यांची गरोदर असताना सासरा मेहबूब याने पती मुबीनकडे काही गोळ्या दिल्या. त्या गोळ्या महिलेला खाण्यास देऊन तिचा गर्भपात घडवून आणला.

तसेच विवाहितेने पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी मामे सासरा अहमद शेख याने धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.