Nigdi Crime News : निगडी खून प्रकरण; घरात लपून बसलेल्या आरोपींना छताचा पत्रा उचकटून ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – ओटास्कीम निगडी येथे एका व्यक्तीचा भांडण सोडविल्याच्या रागातून खून झाला. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री घडली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी एका आरोपीला त्याच्या घरातून अटक केली.

हा आरोपी घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी थेट छताचे पत्रे उचकटून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्यासह अन्य एका आरोपीला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतोष यादव अडागळे (वय 39), वैभव उर्फ बिच्या संतोष अडागळे (वय 19, दोघे रा. अण्णाभाऊ साठेनगर चाळ नंबर दोन, ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

संपत भीमराव गायकवाड (वय 45, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत चाळ, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संध्या संपत गायकवाड (वय 36) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम परिसरात गणपती मिरवणूक सुरू असताना दोन गटात भांडण झाले. ते संपत यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या कारणावरून आरोपींनी गायकवाड यांच्या घरावर दगड मारले. गायकवाड यांनी आरोपींच्या घरासमोर जाऊन ‘तुमची आमच्या घरावर दगड का मारले’ असा जाब विचारला.

या कारणावरून आरोपी वैभव याने सिमेंटच्या गट्टूने गायकवाड यांच्या कपाळावर जोरात मारले तर अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गायकवाड यांना ठार मारले. त्यानंतर आरोपी संतोष याने संपत यांचे जमिनीवर पडलेले रक्त पाणी टाकून धुवून पुरावा नष्ट केला.

पोलीस आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी संतोष हा त्याच्या घरात लपून बसला आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्याच्या घराचा दरवाजा थोपटला. परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा देखील तोडता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट त्याच्या घराच्या छताचे पत्रे उचकटून घरात प्रवेश केला. घरात संतोषचा शोध घेतला असता तो घरातील पलंगाखाली लपून बसला होता. पोलिसांनी संतोषला अटक केली.

त्याच्या मुलाला देखील पोलिसांनी एका घरात लपून बसल्याचे समजल्याने त्या घरातून अटक केली आहे. यासह एका अल्पवयीन मुलाला त्याच्या मामाच्या घरुन, एका अल्पवयीन मुलाला परराज्यात पळून जात असताना ताब्यात घेतले. एकूण तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे, केरबा माकणे, तपास पथकातील पोलीस हवालदार किशोर पढेर, आनंद साळवी, सतिश ढोले, किसन शिंदे, पोलीस नाईक विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, रमेश मावसकर, भुपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, पोलीस शिपाई अमोल सांळुखे, तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नंदु कदम तसेच पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.