Nigdi Crime News : हवेत कोयते नाचवून दंगा करणाऱ्या सात जणांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हवेत कोयते नाचवून दंगा करणाऱ्या सात जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास सिद्धार्थनगर ओटास्कीम येथे घडली.

अकबर इस्माईल शेख (वय 19), आजिनाथ बबन कांबळे (वय 21), विशाल अरुण कांबळे, गणेश जाधव (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर आणि अजिनाथ या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले आहेत. असे असताना आरोपींनी सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास आझाद चौकाकडून काळभोर गोठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धार्थनगर ओटास्कीम येथे कोयते बाळगून ते हवेत नाचवून दंगा केला.

तसेच लोकांमध्ये दहशत निर्माण केली. आरोपींनी केलेल्या या दहशतीमुळे लोक घाबरून रस्त्याने सैरावैरा पळत होते. तसेच लोकांनी घराचे दरवाजे बंद केले. याबाबत कारवाई करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.