Nigdi crime News : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – प्रियकराने लग्नासाठी नकार दिला. त्यातून आलेल्या नैराश्यातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणीने दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या. त्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानंतर प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 जानेवारी रोजी राजनगर,ओटास्कीम, निगडी येथे घडली.

धनंजय बाळासाहेब राऊत (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत मुलीच्या 38 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 21 वर्षीय मुलगी आणि आरोपी धनंजय यांचे प्रेमसंबंध होते. धनंजय याने मुलीला लग्नाचे आश्वासन दिले मात्र तिच्यासोबत लग्न केले नाही. मुलीला शिवीगाळ करून तिला मानसिक त्रास दिला.

त्यातून तरुणीला मानसिक ताण आणि नैराश्य आले. तो त्रास सहन न झाल्याने तरुणीने 23 जानेवारी रोजी दुपारी पावणे एक ते सव्वा एक वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये धनंजय याने तिची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यावरून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.