Nigdi crime News : भंगार व्यावसायिकावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मित्रांसोबत थांबलेल्या एका भंगार व्यावसायिकाला त्याच्या भावासोबत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दोन पिस्तूलमधून भंगार व्यावसायिक आणि त्याच्या मित्राच्या दिशेले दोन गोळ्या झाडल्या. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री पावणे बारा वाजता सेक्टरक्रमांक 22, निगडी येथील बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर घडली. यातील दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सात पथकांनी शोधून अटक केली आहे.

सुरज सुभाष पवार (वय 27), राहुल यल्लप्पा सोनकांबळे (वय 25, दोघे रा. सेक्टर क्रमांक 22, निगडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रशांत रमेश कोळी (वय 32) हा अद्याप फरार आहे.

याबाबत भरत ज्ञानोबा थोरात (वय 28, रा सेक्टर क्रमांक 22, आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत हे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावासोबत आरोपींचे शिवीगाळ करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपी एका स्विफ्ट कार (एम एच 14 / 4034) मधून आले. त्यावेळी फिर्यादी बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते.

आरोपी तिथे आले आणि फिर्यादी व त्यांचा मित्र रफिक यांना म्हणाले ‘तुम्हाला ठोकतो. गोळ्या घालतो’. त्यानंतर आरोपी प्रशांत कोळी आणि सुरज पवार यांनी त्यांच्या हातातील पिस्तुलातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र रफिक यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या.

आरोपींनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपापल्या घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घेतले असल्याचे भरत थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना देत निगडी पोलिसांची तीन आणि गुन्हे शाखेची चार अशी एकूण सात पथके आरोपींच्या मागावर पाठवली.

दरम्यान, पोलीस हवालदार सतीश ढोले यांना माहिती मिळाली की, हे आरोपी तळवडे परिसरात लपून बसले आहेत. त्यानुसार उपायुक्त मंचक इप्पर आणि सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या दोन पथकांनी सापळा लावला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा अगून्हा त्यांचा साथीदार प्रशांत रमेश कोळी याच्यासोबत मिळून केला असल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक निरीक्षक एल. एन. सोनवणे, व्ही. एम. धुमाळ, उपनिरीक्षक महेंद्र आहेर, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतीश ढोले, शंकर बांगर, राजेंद्र जाधव, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, अमोल साळुंखे, भूपेंद्र चौधरी, विजय बोडके, राहुल मिसाळ, दीपक जाधवर, तुषार गेंजगे, पाचपांडे, अप्पा माने, गरदरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.