Nigdi Crime News : नकली पिस्टलच्या धाकाने लूटमार करणाऱ्या दोन सराईतांना अटक

एमपीसी न्यूज – नकली पिस्टलचा धाक दाखवून लूटमार करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लक्ष्मण नागनाथ इगवे (वय 21, रा. देहूगाव), अजय प्रकाश जाधव (वय 23, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तमीम अल्लाबक्ष अन्सारी (वय 40, रा. नेवाळे वस्ती, चिखली) हे 13 जानेवारी रोजी सायंकाळी संभाजी चौक, आकुर्डी येथे हॉस्पिटलमध्ये गेले होते.

हॉस्पिटल समोरील रस्त्यावर कारमध्ये बसून ते त्यांच्या पत्नीची वाट पाहत असताना एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यातील एकाने त्यांना पिस्टलचा आणि एकाने चाकूचा धाक दाखवला. शस्त्राच्या धाकाने अन्सारी यांच्याकडून लॅपटॉप, रोख रक्कम, मोबाईल फोन चोरून नेला.

याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी निगडी पोलिसांनी दोन पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडे कसून तपास करण्यात आला. त्यात त्या आरोपींनी म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत केलेल्या आणखी दोन गुन्ह्यांची देखील कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून 10 हजारांचा एक मोबाईल फोन, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी, चाकू, नकली पिस्टल, असा 55 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस अंमलदार किशोर पढेर, सतीश ढोले, राजेंद्र जाधव, शंकर बांगर, विलास केकाण, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, विजय बोडके, भूपेंद्र चौधरी, राहुल मिसाळ, दीपक जाधवर, अमोल साळुंखे, तुषार गेंगजे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.