Nigdi Crime News : ‘त्या’ दोन खुनी हल्ला प्रकरणी दोघांना अटक; पिंपरी पोलिसांकडील गुन्हा निगडी पोलिसांकडे वर्ग

NCP MLA Anna Bansode Firing

एमपीसी न्यूज – कंत्राटदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात तोडफोड करून काही जणांवर खुनी हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कंपनीच्या सुपरवायझरचे अपहरण करून त्याच्यावर खुनी हल्ला केला. या प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच यातील एक गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल होता, तो गुन्हा देखील निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुलतान इम्तीयाज कुरेशी (वय 20, रा. आंनदनगर, चिंचवड), रोहीत उर्फ सोन्या गोरख भोसले (वय 20, रा. गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी, चिकन चौक, ओटास्किम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी (दि. 12) दुपारी गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेच्या आदल्या दिवशी (मंगळवार, दि. 11 मे) आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याने त्याच्या साथीदारांसोबत एका ठेकेदाराच्या कार्यालयात घुसून काही जणांवर प्राणघातक हल्ला केला. तर गोळीबार घडण्यापूर्वी बुधवारी (दि. 12) सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांनी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरचे अपहरण करून त्याला काळभोरनगर येथे आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या दोन्ही प्रकरणांमध्ये खुनाच्या प्रयत्नाचे पिंपरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझर विरोधात देखील खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात गोळीबार करणाऱ्या आरोपीला घटना घडल्यानंतर तात्काळ अटक करण्यात आली आहे.

पिंपरी पोलिसांकडील गुन्हा निगडी पोलिसांकडे वर्ग

आमदार बनसोडे यांच्या मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून ठेकेदार कंपनीच्या सुपरवायझरचे आकुर्डी येथील कार्यालयातून अपहरण केले. त्यानंतर त्याला पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणून त्याच्यावर खुनी हल्ला केला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्याची सुरुवात आकुर्डी येथे (निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत) झाल्याने हा गुन्हा पिंपरी पोलिसांकडून निगडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.