Nigdi Crime : पोलीस रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. हे दोन्ही गुन्हेगार मागील काही दिवसांपासून एका मारहाणीच्या गुन्ह्यात फरार होते.
धनंजय ऊर्फ बबल्या सूर्यकांत रणदिवे (वय 22, रा. सेक्टर नंबर 22, ओटास्कीम, निगडी), सचिन गुलाब जाधव (वय 22, रा. राहूलनगर, ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
3 सप्टेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरनामसिंग कांचनसिंग जुन्नी (वय 21, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी धनंजय आणि सचिन यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जुन्नी आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी आपसात संगनमत करून 2 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांवर हल्ला केला. पालघन, कोयता, फायटर, तलवार आणि लोखंडी पाईपने आरोपींनी तिघांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी यांच्या पाठीवर, त्यांचा मित्र सातलिंग संगोळगी यांच्या हातावर आणि मारुती धोत्रे यांच्या ओठावर गंभीर दुखापत करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी दरोडा विरोधी पथक करत होते. खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी रविवारी (दि. 13) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप 25, तडीपार, फरारी आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे व पोलीस शिपाई राजेश कौशल्य यांना माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील आरोपी देहू फाटा आळंदी येथे येवले चहाच्या दुकानासमोर थांबले आहेत.
पोलिसांनी सापळा रचून धनंजय आणि सचिन यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यावरून दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी धनंजय रणदिवे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सन 2019 मध्ये निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी सचिन जाधव हा देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.