Nigdi : बोगस रेशनकार्ड दिल्याप्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – बोगस रेशनकार्ड बनवून देण्याचा आणखी एक प्रकार निगडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी देहूगाव येथील एका दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी येथील एका महिलेने बोगस रेशनकार्ड दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे बोगस रेशनकार्ड बनवून देणा-या दलालांचे रॅकेट शहरात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

नितीन महादेव पडाळघरे (वय 40, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, धनंजय ऊर्फ धनराज चव्हाण (रा. देहूगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशनिंग ऑफिसमध्ये ओळख आहे, तुमचे काम लगेच करून देतो, असे आरोपी याने फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी एक हजार दोनशे रुपये रोख, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड झेरॉक्स, पत्नीचे पॅनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, लग्नपत्रिका, जुन्या शिधापत्रिकेची झेरॉक्स अशी कागदपत्रे आरोपीने फिर्यादी यांच्याकडून घेतली. त्यानंतर सुमारे 10 दिवसांनी फिर्यादी यांना नवीन केशरी रंगाची शिधापत्रिका दिली.

नवीन शिधापत्रिकेवर धान्य मिळावे म्हणून चौकशी करण्यासाठी फिर्यादी निगडी येथील धान्य पुरवठा खात्याचे परिमंडळ कार्यालय, ‘अ’ विभाग येथे गेले. आरोपी याने दिलेली शिधापत्रिका बोगस असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. आरोपी चव्हाण याने विश्वास संपादन करून फिर्यादी यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.