Nigdi : ‘ट्रान्सपोर्टनगर’चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करा 

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांची मागणी 

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील  निगडीतील ‘ट्रान्सपोर्टनगर’चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी  महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील ट्रान्सपोर्टनगर परिसराला व्यावसायिक दृष्टीने मोठे महत्व आहे. देशभरासह महाराष्ट्रातील वाहतूक व्यावसायिकांची या नगरीत आवक-जावक चालू असते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाला ‘ट्रान्सपोर्टनगर’ म्हणून ओळखले जाते. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. बाळासाहेबांनी मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी माणसाला त्याच्या न्याय हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे. देशभरातील वाहतूकदारांना बाळासाहेबांविषयी अतिशय प्रेम, आस्था आहे.

‘ट्रान्सपोर्टनगर’चे बाळासाहेब ठाकरे नगर असे नामकरण करण्याची मागणी वाहतूक व्यावसायिकांसह इतर नागरिकांची आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे त्वरित ‘ट्रान्सपोर्टनगर’चे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी  सय्यद यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनाची प्रत ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ यांना दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.