Nigdi : निगडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी तातडीने सुरु करा; ‘पीसीसीएफ’ची मागणी

एमपीसी न्यूज – निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी विद्युतदाहिनी तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) या संघटनेने केली आहे.

याबाबत संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे. विद्युत दाहिनीस 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्युत दाहिनीचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होत आहे. नादुरुस्त झाल्यावर महिना-महिना भर दाहिनी बंद ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

मृतदेह दहन करण्यासाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यासाठी पैसे पण अधिक लागतात. तसेच लाकडांसाठी झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यासाठी महापालिकेने तातडीने अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी सुरु करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

स्थानिक नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे म्हणाले, ”अमरधाम स्मशानभुमीतील विद्युतदाहिनीचे आयुष्य 10 वर्षाचेच होते. विद्युत दाहिनीला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ही विद्युतदाहिनी कधीही बंद होऊ शकते. त्यासाठी नवीन दाहिनी बसविण्यात येणार आहे. आपण स्थायी समितीचा सदस्य असताना विद्युतदाहिनी बसविण्यासाठी येणा-या खर्चाला मान्यता घेतली आहे. स्मशानभूमीत लवकरच नवीन विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे”.

याबाबत बोलताना ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग) प्रवीण घोडे म्हणाले, ”स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी सात जानेवारीपासून बंद आहे. दाहिन्याच्या दुरुस्तीचे काम काम हाती घेण्यात आले आहे. कॉईल आणि विटा बदलल्या जाणार असून त्या ऑर्डर देऊन तयार करुन घ्यावा लागतात. त्यामुळे दुरुस्तीला विलंब लागत आहे. येत्या सात ते आठ दिवसात विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.