Nigdi Disrupted water supply News: विस्कळीत पाणीपुरवठा!  मनसेने अधिकाऱ्याच्या बोर्डाला फासले काळे

एमपीसी न्यूज – निगडी प्रभागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी स्थानिक नागरिकांसमवेत पाणी पुरवठा विभागात धाव घेतली. परंतु, आपल्या दालनात उपस्थित नसणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात मनसेने आक्रमक होत आंदोलन केले. या वेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीला, बोर्डाला काळे फासत घोषणाबाजी करण्यात आली.

प्रभाग क्र.13,से. क्र. 22, निगडी-यमुनानगर विभागात पिण्याच्या पाण्या संदर्भातील अनेक तक्रारी देऊन देखील त्यावर कोणत्याही उपाययोजना न झाल्याने फ क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा अधिकारी शहाजी गायकवाड यांच्या दालनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे प्रभागातील नागरिकांसमवेत गेले.

परंतु, तेथे अधिकारी उपस्थित नसल्याचे चिखले यांचा पारा चढला. चिखले यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीला तसेच बोर्डाला काळे फासत मनसे स्टाईल खळ-खट्ट्याक आंदोलन केले. मनसेचे पदाधिकारी व नागरिकांनी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चिखले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेक आरोप केले.

प्रभागात वेळेवर पाणी सोडण्यात येत नाही. पाणी पुरवठा बाबत अनियमितता असून से.क्र. 22 या विभागातील पाणीपुरवठा करणेकामी नेमण्यात आलेले वॉल्व्हमन वेळेवर पाणी सोडत नाहीत. पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रिक मोटर अत्यंत जीर्ण स्वरूपाच्या झाल्या असल्याने त्या वारंवार बंद पडत आहेत.यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करणे पालिकेची जबाबदारी आहे. होणारे बिघाड तत्काळ दूर करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन तसेच संबंधित अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडविण्यात यावा, अन्यथा याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे. सदर आंदोलनाला राजू खाडे व प्रभागातील नागरीक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.