Nigdi : आठ कोटींचे कर्ज मिळवून देतो असे सांगून, डाॅक्टरची 40 लाखांची फसवणूक

आरोपी हा एजंट असून नाव बदलून फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे

एमपीसी न्यूज – ‘डाॅक्टरांसाठी एक स्कीम आहे, ज्याद्वारे मी तुम्हाला आठ कोटींचे कर्ज मिळवून देतो असे, सांगून डाॅक्टरचा विश्वास संपादन केला व त्यांची 40 लाखांची फसवणूक केली. ही घटना 18 जून ते 27 जुलै दरम्यान घडली आहे. फसवणूक झालेले डाॅक्टर आकुर्डी येथील स्टार हाॅस्पीटलमध्ये कार्यरत आहेत.

याप्रकरणी डाॅ. अमित अनंत वाघ (वय.36, रा.इमिरेट हिल, सोमाटणे फाटा, तळेगांव ) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आरोपी रोहन पवार या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी हा एजंट असून नाव बदलून फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन पवार याने फिर्यादी डाॅक्टर वाघ यांना फोन करुन मी स्टॅण्डर्ड चार्टड बँक, कल्याणीनगर शाखेतून बोलत असल्याचे सांगितले.

तसेच, डाॅक्टरांसाठी एक लोनची स्कीम आहे. तुम्हाला लोनची गरज आहे का? अशी त्यांना विचारणा केली. आरोपी रोहन याने डाॅ. वाघ  यांचा विश्र्वास संपादन करून 8 कोटी लोन काढून देतो असे सांगितले व त्यांच्याकडून केवायसी कागदपत्रे घेतली.

त्यानंतर रोहन याने स्टॅण्डर्ड चार्टड बँक कल्याणीनगर शाखेचे 8 कोटीचे बनावट लोन मंजूर पत्र तयार करुन डाॅक्टरांना दिले व काही दिवसात लोनची रक्कम खात्यावर जमा होईल, असे सांगितले.

त्याबदल्यात आरोपी रोहन याने डॉक्टरांकडे 40 लाख रुपयांच्या कमीशनची मागणी केली. डॉक्टरांनी कमीशनची रक्कम कॅश स्वरूपात आरोपी रोहन यांच्याकडे सुपूर्द केली.

बरेच दिवस उलटले तरी लोनची रक्कम बँक खात्यावर जमा झाली नसल्याने फिर्यादी डॉ. वाघ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.

निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.