Nigdi : अग्निशमन दलाच्या जवानांमुळे ‘त्या’ घारीने पुन्हा घेतली आकाशात भरारी(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज – शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या काचेच्या डक्टमध्ये अडकलेल्या घारीला प्राधिकरण अग्निशमन उपकेंद्राच्या जवानांनी जीवनदान दिले. अरुंद डक्टमधून दोरीच्या सहाय्याने वीस ते पंचवीस फूट खोल उतरून घारीला वाचविण्यात जवानांना यश आले आहे. आज, गुरुवारी (दि. 12) दुपारी पावणेएकच्या सुमारास घारीला बाहेर काढण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वाबारा वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या प्राधिकरण उपकेंद्रात सागर चव्हाण यांनी फोन केला. निगडी चौकातील कोहिनूर ऑर्किड येथे काचेच्या डक्टमध्ये एक घार अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, प्राधिकरण उपकेंद्राचे वाहन चालक परशुराम इसवे, फायरमन सारंग मंगरूळकर, विकास बोंगाळे, अंकुश बडे यांचे पथक तात्काळ निगडी चौकात दाखल झाले.

निगडी चौकात कोहिनूर ऑर्किड हे पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. इमारतीला बाहेरच्या बाजूने काच लावण्यात आली आहे. इमारत आणि काचेच्या मध्ये अतिशय अरुंद काही भाग रिकामा (डक्ट) आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास एक घार या डक्टमध्ये अडकली. दुस-या मजल्यावर घार अडकली होती.

जवानांनी दोरीच्या साहाय्याने डक्टमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. डक्टमध्ये अडकलेल्या घारीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात जवानांना यश आले. बाहेर काढल्यानंतर घारीने पुन्हा एकदा आकाशात उंच भरारी घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.