Nigdi : सावरकर मंडळाचा स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम स्तुत्य – चंद्रकांत पाटील

एनडीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील अनेक तरुणांना सैन्यदलात जाण्याची इच्छा आहे. त्यांच्यात उर्जा, क्षमता आहे. परंतु, आर्थिक अडणींमुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. योग्यवेळी योग्य दिशा मिळत नसल्याने अनेक युवकांचे सैन्यदलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने सुरु केलेला स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्वगार राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

निगडीतील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने गतवर्षीपासून सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षा विभागात मार्गदर्शन घेऊन ‘एनडीए’मध्ये निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रमेश बनगोंडे, आनंद रायचूर, दीपक नलावडे, भास्कर रिकामे यावेळी उपस्थित होते. मंडळाच्या स्पर्धा परीक्षण केंद्रात मार्गदर्शन घेऊन पहिल्या वर्षी दोन आणि दुस-या वर्षी तीन विद्यार्थी ‘एनडीए’ प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यातील एक विद्यार्थी साहील बिरजे हा देशात 58 वा क्रमांक मिळवून एनडीएच्या 141 व्या तुकडीमध्ये दाखल होणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील गोरगरिबांसाठी मंडळ कार्य करत आहे. स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांना योग्य टप्प्यावर मार्गदर्शन मिळत नाही. सावरकर मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा विभाग सुरु करुन तरुणांसाठी मार्गदर्शन केले जात आहे. हे अतिशय प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. मंडळातील वर्गात प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. तसेच त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो”.

मंडळाचे भास्कर रिकामे यांनी मार्गदर्शनवर्गाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ”सावरकर मंडळाने सुरु केलेल्या विद्यार्थ्यांची ब्रिगडीयर बलजीतसिंग गिल व ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी लेखी व तोंडी परीक्षेची तयारी करुन घेतली. ग्रामीण भागातील तसेच आर्थिक अडचण असलेल्या मुलांना शुल्कात सवलत तसेच पूर्ण माफी देण्यात आली. काही मुलांचे शुल्क मंडळाच्या पदाधिकारी व देणगीदार यांनी जमा केले. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही या मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून मंडळाचे अभिनंदन होत आहे”.

एप्रिल व मे मध्ये होणा-या वर्गासाठी जानेवारी 2019 मध्ये प्रवेश परीक्षा सुरु होणार आहे. याचा जास्तीतजास्त मुलांनी लाभ घ्यावा असे, आवाहन रिकामे यांनी यावेळी केली. हे वर्ग सुरू करण्यासाठी रमेश बनगोंडे, विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, आनंद रायचूर, प्रदीप पाटील व ग्रंथालय स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.