Nigdi : निगडीतील राष्ट्रध्वज 15 ऑगस्टला फडकता ठेवण्याची शिवसेना नगरसेवकाची मागणी 

एमपीसी न्यूज – देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी असलेले प्रेम नव्या पिढीच्या मनात कायम रुजत राहावे, या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी केली. परंतु, या ध्वजाला फडकण्याची प्रतीक्षा आहे. बहुतांश वेळा हा राष्ट्रध्वज काढून ठेवण्यात येत असून आजही हा ध्वज काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून  नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वातंत्रदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी हा ध्वज फडकता ठेवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य अमित गावडे यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच हा राष्ट्रध्वज अखंडपणे फडकता ठेवण्याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात गावडे यांनी म्हटले आहे की,
पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या प्रमाणात गर्दी जमणा-या प्रमुख भागांपैकी निगडीचा भक्ती-शक्ती चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह पालिकेने या ठिकाणी उभारले आहे. पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार मानल्या जाणा-या या उद्यान परिसरात पालिकेने राष्ट्रध्वज असणारा सर्वाधिक उंचीचा झेंडा उभारण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भरच पडली आहे. परंतु, हा ध्वज कायमस्वरुपी फडकता ठेवला जात नाही.

गेल्या सात महिन्यांत तब्बल दहा ते बारा वेळा राष्ट्रध्वजाचे कापड फाटले होते. या ध्वजाचे वजन 80 किलो असून  वा-याचा वेग आणि वजनामुळे वारंवार ध्वज काढण्याची वेळ येत असल्याचे सांगितले जाते. पंरतु, यावर कायमस्वरुपी मार्ग काढणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने आजपर्यंत उपाययोजना करणे अपेक्षित होते. तथापि, पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने ध्वज मजबूत बनवून घ्यावा. राष्ट्रध्वज अखंडपणे फडकता ठेवण्यात यावा, अशी मागणी गावडे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.