Nigdi: तीन मजली पुलाच्या कामाला चार महिने मुदतवाढ; महापौरांचे निर्देश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुल व वर्तुळाकार रस्त्याचे (रोटरी) काम निर्धारित कालावधीत पूर्ण झाले नाही. कामाची मुदत 26 डिसेंबर 2019 रोजी संपली आहे. ठेकेदाराने 18 डिसेंबर रोजी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत भाववाढ फरकासह मुतदवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर उषा ढोरे यांनी चार महिने पहिली मुदतवाढ दिली असून 1 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. महापौरांसह स्थानिक नगरसेवकांनी आज (सोमवारी) पुलाच्या कामाची पाहणी केली.

मुंबईहून पुण्याकडे येताना तसेच, मावळ तालुक्यातून येताना पिंपरी-चिंचवडच्या सुरुवातीचे स्मार्ट सिटीचे प्रवेशद्वार म्हणून भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान चौकाची ओळख आहे. वाहतुक सुरळीत व अधिक सुरक्षित होण्यासाठी महापालिकेने चौकात उड्डाणपुल, ग्रेडसेपरेटर, रोटरी रस्ता बांधण्याच्या कामास सुरूवात केली आहे. हे काम 90 कोटी 53 लाख रुपयांमध्ये बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कंपनीला दिले असून कामाचा आदेश 27 जून 2017 रोजी देण्यात आला आहे. कामाची निर्धारित मुदत 30 महिने 26 डिसेंबर 2019 रोजी संपली आहे. निर्धारित मुदतीत काम पुर्ण झाले नाही.

पाणीपुरवठा विभाग, एमआयडीसीच्या सेवावाहिन्या स्थलांतरीत करणे. त्यासाठी शटडाऊन घेऊन सेवावाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक होते. परंतु, शटडाऊन मिळण्यास विलंब झाला. निगडी पोलीस ठाणे ते त्रिवेणीनगर या मार्गावरील उच्चदाब विद्युत वाहिनींचे टॉवर स्थलांतरीत करण्याच्या कामास विद्युत विभागामार्फत करण्यास विलंब झाला.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मडामंडळाच्या (एमएसआरडीसी) हद्दीमध्ये पुलाचे दोन रॅम्प, डाऊन वर्ड रॅम्प येत असल्याने एमएसआरडीसीच्या पुणे, मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग (एनएचआय) दिल्ली यांच्याकडून ना-हरकत प्रमाणत 10 डिसेंबर 2019 रोजी मिळाले.

त्यामुळे ठेकेदाराने 18 डिसेंबर 2019 रोजी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. कामाची व्यापी विचारात घेता काम पुर्ण होण्यास आठ महिने लागू शकतात. त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत भाववाढ फरकासह मुदतवाढ देण्याचे सल्लागार स्तुप कन्स्लटंट यांनी 24 डिसेंबर 2019 रोजी महापालिकेकडे शिफारस केली. दरम्यान आज पदाधिका-यांनी कामाची पाहणी केली. महापौर ढोरे यांनी 1 मे पर्यंत काम पुर्ण करण्याचे आदेश देत चार महिन्यांची पहिली मुदतवाढ दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.