Nigdi : ट्रेडिंग खात्यातून परस्पर पैसे काढून महिलेची 24 लाखांची फसवणूक; शेअर ब्रोकरविरोधात गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – परस्पर गुंतवणूक करणाऱ्या शेअर ब्रोकरने महिलेकडून ट्रेनिंग खात्याचा पासवर्ड घेऊन तिच्या खात्यातून सुमारे 24 लाख 50 हजार रुपये काढले. हे पैसे अन्य ठिकाणी गुंतवून नुकसान केले. ही घटना निगडी येथे जानेवारी 2017 ते जून 2018 या कालावधीत घडली.
अनिता झेविअर (वय 48, रा. सिंधूनगर कॉलनी, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोसेफ पॉल (वय 47 पत्ता माहित नाही) या शेअर ब्रोकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2017 ते जून 2018 या कालावधीमध्ये आरोपींनी फिर्यादी अनिता यांचा विश्वास संपादन केला. त्यांना शेअर मार्केटमध्ये 24 लाख 50 हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या ट्रेडिंग खात्याचा पासवर्ड घेऊन अनिता यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर कुठेतरी गुंतवणूक करून रकमेचे नुकसान केले. तसेच फिर्यादी अनिता यांचा विश्वासघात केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.