Nigdi : शांततापूर्ण जगासाठी ‘आयुध’च्या शिबिरात लक्ष्य निर्धारित

एमपीसी न्यूज – माता अमृतानंदमयी मठ येथे झालेल्या आयुध प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या युवकांनी शांततापूर्ण जगासाठी आपले लक्ष्य निर्धारित केले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, छत्तीसगड आणि तामिळनाडूमधील 200 हून अधिक तरुण आयुध प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले होते.

आयुध (अमृता युवा धर्म धारा) ही माता अमृतानंदमयी मठाची आंतरराष्ट्रीय युवा संघटना आहे. ‘आयुध’च्या शाखा 40 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहेत. प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पुण्याच्या माता अमृतानंदमयी मठाचे प्रमुख स्वामी विद्यामृतानंद पुरी यांच्या हस्ते झाले. स्वामींनी “भारतीय संस्कृती” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या शिबिरास अम्माचे सर्वांत ज्येष्ठ शिष्य तसेच माता अमृतानंदमयी मठाचे उपाध्यक्ष आणि अमृता विश्व विद्यापीठमचे अध्यक्ष स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी यांनी आशीर्वाद दिला. स्वामीजी म्हणाले की, “जगभरातील संस्कृतींमध्ये परत देण्याची परंपरा आहे. प्रत्येक वस्तूला त्याची किंमत असते, काहीही विनामूल्य नाही. भविष्यात या शिबिराचे फायदे शिबिरार्थी घेतील पण, त्यासाठी त्यांना शिस्त आणि परिश्रमाची किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत अशा शिबिरांमधून त्यांच्यात निर्माण होते.”

या शिबिरामध्ये संघटन कौशल्य आणि जीवन कौशल्य कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, योग आणि ध्यान सत्र, सांस्कृतिक दौरे आणि साहसी खेळ यांच्याबरोबरच सनातन धर्मविषयक प्रेरणादायक भाषणांची पर्वणी शिबिरार्थींना मिळाली.

अहमदाबादच्या इंडस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि भौतिक शास्त्रज्ञ डॉ. मुरुगानंत यांनी अध्यात्माच्या विज्ञानावर व्याख्यान दिले. आयुर्वेदच्या अमृता स्कूलमधील आयुर्वेदातील अमृता सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्चचे संशोधन संचालक पी. राम मनोहर यांनी निरोगी जीवनशैलीबद्दल अंतर्दृष्टी दिली. प्रख्यात कर्नाटकी संगीतकार राघवन मणियन यांची एक संगीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

वायुवा ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक पुंडलिक सीताराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी येथील संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराची सांस्कृतिक सहलही आयोजित करण्यात आली होती. प्रसाद देवळे व टीम झेड बीएसी अ‍ॅडव्हेंचर्सने भगवद्गीतेवर आधारित निर्भयता या संकल्पनेवरील मैदानी खेळ सादर केले.

न्यू इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कु.लक्ष्मी मेनन यांनी शिबिराच्या समारोपाचे भाषण केले. अम्मांनी त्यांना आव्हानांना तोंड देण्यासाठी कशी मदत केली याबद्दलचा अनुभव त्यांनी शिबिरार्थींना सांगितला. त्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देण्यात आली.

सर्व सहभागींनी शिबिराविषयी उत्कृष्ट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्या शिबिरामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ला कमी लेखू नये, नेहमीच आनंदी राहावे, अधिक अध्यात्म शिकण्याचा प्रयत्न करावा, सांघिक कार्याचे महत्त्व, धैर्य आणि संतुलन आदी गोष्टी शिकायला मिळाल्या. यापुढे दररोज नियमित ध्यान आणि योग करू. आनंदी, सकारात्मक व कृतज्ञ राहू, अहंकार सोडून चुका स्वीकारण्याचे धडे शिबिरात मिळाले. दातृत्व ही जगामधील सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळाली. केवळ कोणाला काही देऊन आपण आनंदी होऊ शकतो, अम्मा हे सतत प्रेरणास्थान आहे. त्यांनी आमच्या धर्माबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली, अशा भावना शिबिरार्थींनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.