Nigdi: दिव्यांग मुलांनी बनविल्या जवानांसाठी पर्यावरणपूरक राख्या

एमपीसी न्यूज – रक्षाबंधननिमित्त यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दिव्यांग युनिटमधील कर्णबधीर मुलांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पोस्टद्वारे सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या आहेत.

सीमेवरील जवान डोळ्यात तेल घालून अहोरात्र भारतीयांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. यामुळे त्यांना अनेक सण , उत्सवाचा आनंद घेता येत नाही. जवानांच्या या त्यागाचे स्मरण ठेऊन त्यांनाही रक्षाबंधन सणाचा आनंद घेता यावा, या हेतूने मॉडर्नमधील दिव्यांग युनिटमधील अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत.

  • मॉडर्न हायस्कुलमध्ये गेली अनेक वर्षांपासून दिव्यांग युनिट सुरू आहे. या दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही व्यावसायिक कौशल्य आत्मसाद होण्यासाठी असे उपक्रम राबवित असल्याचे दिव्यांग युनिटच्या शिक्षिका कुसुम पाडळे यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कुसुम पाडळे, अनुराधा अंबेकर यांनी कागदापासून या राख्या तयार करून घेतल्या. दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या राख्या पोष्टाद्वारे सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या आहेत.

  • या उपक्रमासाठी कुसुम पाडळे, अनुराधा अंबेकर, सुरेखा कामथे, राजीव कुटे, शिवाजी अंबिके यांनी मार्गदर्शन केले. तर, प्राचार्य सतीश गवळी, व्हिजिटर प्रा.मानसिंग साळुंके, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्राध्यापिका ज्योत्स्ना एकबोटे यांनी दिव्यांग मुलांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.