Nigdi: ‘हॉटस्पॉट’ आनंदनगरमधील नागरिकांना ग्रीन झोनमधील ‘पीसीसीओई’त क्वारंटाईन करण्यास विरोध; नगरसेवकांचा ठिय्या

एमपीसी न्यूज – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला आहे.

आजपर्यंत निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी दक्षता घेत हा प्रभाग कोरोनामुक्त ठेवला आहे. प्रभाग ग्रीनझोन आहे. त्यामुळे या ठिकाणी हॉटस्पॉटमधील नागरिकांना ठेवणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगत नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ यांनी क्वारंटाईन सेंटरला विरोध केला आहे. सकाळपासून त्यांनी तिथे ठिय्या मांडला आहे.

चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील 60 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासनाने आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे.

काल 14 नागरिकांना तिथे क्वारंटाईन केले आहे. 500 नागरिकांना तिथे क्वारंटाईन करण्याचे नियोजन आहे. परंतु, आनंदनगरमधील नागरिकांना त्या परिसरातच क्वारंटाईन करावे. आमच्या ग्रीनझोन मध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल, अशी भिती व्यक्त करत स्थानिक नगरसेवकांनी त्याला विरोध केला आहे.

नगरसेवक अमित गावडे म्हणाले, ”निगडी प्राधिकरण ग्रीनझोन आहे. परंतु, प्रशासन आनंदनगरमधील 500 नागरिकांना ‘पीसीसीओई’तील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवणार आहे. त्याची कोणालाही पुर्वकल्पना न देता 14 नागरिकांना रात्री आणून ठेवले आहे.

त्यातील काही पॉझिटीव्ह रुग्ण आल्यावर त्यापासून निगडीतील नागरिकांना धोका होवू शकतो. त्या नागरिकांना आनंदनगर परिसर, त्या प्रभागातील शाळेतच क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. ग्रीनझोनमध्ये क्वारंटाईन करणे चुकीचे आहे. त्याला आमचा विरोध आहे. आम्ही सकाळपासून तिथे बसून आहोत. कोणालाच आतमध्ये जावून देणार नाहीत”.

नगरसेवक राजू मिसाळ म्हणाले, प्राधिकरणातील नागरिकांनी आजपर्यंत खबरदारी घेतली. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन केले. त्यामुळे निगडी प्राधिकरणात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. एकही रुग्ण सापडला नाही. बाजूच्या रावेत, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, ओटास्कीममध्ये रुग्ण सापडले.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांच्या दक्षतेमुळे प्राधिकरणात रुग्ण सापडला नाही. आम्हा नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने जाणूनबुजून ग्रीनझोनला रेडझोन करण्याचे ठरविले आहे. आम्हाला काही न सांगता आनंदनगरमधील 14 नागरिकांना पीसीसीओईमध्ये ठेवले आहे.

याठिकाणी 530 नागरिकांना क्वारंटाईन केले जाणार आहे. परंतु, आमचा त्याला विरोध आहे. त्यामुळे आम्ही सकाळपासून ठिय्या मांडला आहे. आमचा भाग ग्रीनझोन राहिला पाहिजे. त्यासाठी आमचा विरोध आहे.

महापालिका शाळा रिकामी असताना तेथील पेशंट इकडे आणण्याचा अट्टहास का ?. संबंधीत पेशेट आरडाओरडा करतात. तसेच त्यांचे नातेवाईक इकडे येत आहेत. आगामी काळात कोरोनाचे पेशंट वाढणार आहेत, त्यामुळे गहुंजे स्टेडियम ताब्यात घेऊन तेथे त्यांची व्यवस्था करावी.

आकुर्डीतील भाजी मंडई बंद करुन निगडीत सुरु केली आहे. ती बंद करण्यासाठीही माझा आणि अमित गावडे यांचा विरोध होता. त्यावेळीही प्रशासनाने ऐकले नाही. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अगोदरच नागरिकांमध्ये भिती आहे.

विरोध करु नये – आयुक्त श्रावण हर्डीकर

”शहरातील एका भागातील अडचण नाही. जगामध्ये पसरलेला हा रोग आहे. त्यामुळे शहरात उपलब्ध असलेली ठिकाणे ताब्यात घेतली आहेत. त्यासाठी कोणी विरोध करु नये. आकुर्डी, निगडी पुरता हा विषय मर्यादित नाही. सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी विरोध करायचे ठरवले. तर कसे करता येईल.

अशा स्वरुपाची भुमिका कोणत्याही नागरिकांनी घेवू नये. आजपर्यंत सगळ्यांनी सहकार्य केले आहे. होम क्वारंटाईन करणा-या नागरिकांनाही सुरुवातीला विरोध झाला. परंतु, नंतर तेच धोरण उपयोगी ठरले. जेवढे लवकर लोक सापडतील. तेवढा प्रसार कमी होईल. त्यामुळे शहर नियंत्रणात येईल.

त्यासाठी क्वारंटाईन सेंटरला कोणीही विरोध करु नये. क्वारंटाईन सेंटरला ज्या-ज्या सुविधा, बॅरिकेट्स करायचे आहे. त्याची दक्षता घेतली जाईल”, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.