Nigdi : निगडी, चिखली येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात एकूण एक लाख 59 हजार 900 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत शनिवारी (दि. 14) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सुमन दत्तात्रय थोरात (वय 71, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी थोरात यांचे घर कुलूप लावून बंद होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील 64 हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

विशाल गंगाधर घोगरे (वय 29, रा. रुपनीगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रुपनीनगर, तळवडे येथे गुरुवारी (दि. 12) पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली. फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा आतून कडी लावून बंद होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात घालून दरवाजाची कडी कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून सोन्याचे दागिने व मोबाइल हँडसेट असा एकूण 95 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.